दहिवडीत आरंभ पालक मेळाव्यातून बालसंगोपणा विषयी जनजागृती
दहिवडी दि. 22 : महाराष्ट्र शासन बाल विकास प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी बिट मार्फत आरंभ पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकांमध्ये बालसंगोपनविषयीं जनजागृती करण्यात आली. या मेळाव्यास दहिवडी पंचक्रोशीतून उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मेळाव्यामधून पालकांना बालसंगोपनाच्या विविध घटकांबाबत माहिती मिळाली, पालक आणि बालसंगोपनाच्या सेवकांमध्ये चर्चा झाली,पालकांना त्यांच्या मुलांसह घरी चांगले संवाद करण्यास प्रोत्साहित करण्यात आले, बालसंगोपनात त्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली,समुदायातील प्रत्येक घटकांपर्यंत बालविकासाचे महत्त्व आणि संदेश पोहोचवला जातो. तसेच या पालक आरंभ मेळाव्यात गरोदर माता,स्तनदा माता व १ ते ३ वर्षाच्या बालकांना द्यावयाचा सकस आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सातारा पूर्व प्रकल्प पर्यवेक्षिका हेमलता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बालसंगोपनाविषयीं माहिती पटवून देण्यासाठी विविध प्रकारच्या कलाकृती साकारल्या होत्या.
या मेळाव्यास प्रियदर्शनी पतसंस्थेचे संस्थापक एड. भास्करराव गुंडगे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, दहिवडी नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप घार्गे, महिला बालकल्याण सभापती मोनिका गुंडगे या प्रमुख मान्यवरांसोबतच एकूण सातशे पेक्षा जास्त पालकांनी उपस्थिती दर्शविली.
