एस टी बस मधे सुविधांचा अभाव
राज्यात दररोज अनेक लोक मोठ्या संख्येने एस टी ने प्रवास करत असतात. एस टी ही एकमेव वाहतूक सुविधा आहे जी खेडयांना शहरांशी जोडते. एस टी महामंडळाच्या राज्यात वेग वेगळ्या प्रकारच्या बस सेवा उपलब्ध आहेत. परंतु याच एस टी बस मधे सुविधांचा अभाव पाहायला मिळत आहे. प्रशासनाने काही लांब पल्ल्याच्या प्रवासा साठी स्लीपर बस जनतेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. स्लीपर आणि निम आराम बस मधे चार्जिंग पॉईंट, फॅन या सुविधा आहेत परंतु काही बस मधे फॅन, चार्जिंग स्विच बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत तर काही बस मधे सीट व्यवस्थित नसल्याने प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
बस मधे प्रवासी सुखदायक प्रवासापासून वंचित राहत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘लाल परी’ मधे प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असलेल्या गोष्टींची कमतरता भासत आहे. काही बस च्या सीट चे हॅन्डल तुटले आहेत तर काही खिडकीच्या काचा तुटलेल्या किंवा खिडकी खोलण्याचे बटन तुटलेल्या अवस्थेत आहेत या मुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मागील काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाने बस तिकीट दरात वाढ केली असून बस मधे असणाऱ्या सोयी सुविधांमधे काहीही सुधारणा दिसून येत नाही. तिकीट दराला अनुसरून या सुविधा प्रवाशांना कधी मिळणार असा प्रश्न निर्माण उपस्थित होत आहे.
