महत्त्वाच्या बातम्या

१०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत राजू जावळकर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे: पुणे शहर आणि लगतच्या विविध जिल्ह्यांमध्ये वाहनचोरीचा मोठा धुमाकूळ घालाणाऱ्या आणि गेल्या तीन दशकांत शंभराहून अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका अट्टल व सराईत वाहनचोराला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अत्यंत धडाकेबाज कारवाई करत जेरबंद केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना सातत्याने चकमा देऊन फरार असलेला ६० वर्षीय सराईत गुन्हेगार राजू बाबुराव जावळकर (रा. डोणजे फाटा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कुख्यात चोराच्या विरोधात गेल्या ३० वर्षांत पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, अहिल्यानगर आणि इतर परिसरांमध्ये मिळून तब्बल १०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

       पुणे पोलिसांच्या वतीने शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच सर्व सराईत, पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमे दरम्यान गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. वर्ष २०२४ मध्ये भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या एका गंभीर गुन्ह्यात हवा असलेला पाहिजे आरोपी राजू जावळकर हा डोणजे फाटा परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. सदर माहिती गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने डोणजे फाटा परिसरात सापळा रचून या अट्टल गुन्हेगाराला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

      पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला राजू जावळकर हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, गेल्या ३० वर्षांत त्याने अनेक ठिकाणी वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या विरुद्ध लावण्यात आलेल्या गुन्ह्यांची संख्या शंभरी पार केली असून, या कारवाईमुळे अनेक जुन्या गुन्ह्यांचा तपास लागण्यास मदत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

        सदरची यशस्वी व धडाकेबाज कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोंखडे, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, तसेच पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, शंकर नेवसे, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, उज्वल मोकाशी, कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संतोष टकले, विजय पवार, शंकर कुंभार, संदीप शिर्के, नागनाथ राख, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे आणि विनायक यांच्या पथकाने अत्यंत समन्वयाने पार पाडली आहे. सराईत आणि फरार गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!