महाड–अक्कलकोट बसमधून विद्यार्थ्यांना निर्जनस्थळी सोडल्याचा प्रकार; मनसे आक्रमक!
दहिवडी: महाड–अक्कलकोट एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोंदवले बुद्रुक व गोंदवले खुर्द या नियोजित थांब्यांवर न उतरवता गावापासून सुमारे दोन किलोमीटर पुढे निर्जनस्थळी सोडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या प्रकारामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवासादरम्यान चालक आणि वाहकांकडून विद्यार्थ्यांना अरेरावी, दमदाटी आणि मानसिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दहिवडी एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन संबंधित चालक व वाहकांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दहिवडी–म्हसवड मार्गावरील सर्व गाड्या अधिकृत थांब्यांवर थांबवण्याच्या स्पष्ट सूचना चालक-वाहकांना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणात ४८ तासांच्या आत प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास मनसेतर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी मनसेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती एसटी विभाग नियंत्रक व दहिवडी पोलीस ठाण्यालाही पाठवण्यात आल्या असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
