डायल ११२ वर खुनाची खोटी माहिती देऊन दहिवडी पोलिसांची दिशाभूल; आंधळी येथील एकावर गुन्हा दाखल
दहिवडी: पत्नीचा खून केल्याचा बनाव रचून डायल ११२ या आपत्कालीन पोलीस हेल्पलाइनवर खोटी माहिती देणाऱ्या व शासकीय यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या एका व्यक्तीवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मान तालुक्यातील आंधळी येथील नायरा पेट्रोल पंपाशेजारी असणाऱ्या ‘फौजी निवास’ येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आंधळी (ता. माण ) येथील सुभेदार भीमराव शेंडे (वय ५०) यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:२७ वाजेच्या सुमारास मद्याच्या नशेत स्वतःच्या मोबाईलवरून आपत्कालीन पोलीस हेल्पलाइन ‘डायल ११२’ वर कॉल केला. “मी माझ्या बायकोचा खून केला असून, तातडीने रुग्णवाहिका व पोलीस मदत पाठवा,” अशी माहिती त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला दिली. मिळालेल्या कॉलच्या आधारे पोलिसांची पळापळ झाली. मात्र, घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, संबंधित व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुहास मोहन गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुभेदार शेंडे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे . घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार एन. एस. रासकर करत आहेत.
पोलिस प्रशासनाचा इशारा –
‘डायल ११२’ ही नागरिकांच्या तातडीच्या मदतीसाठी असलेली आपत्कालीन यंत्रणा आहे. या क्रमांकावर खोटी माहिती देऊन गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
