सातारा जिल्हा बँकेच्या इतिहासात प्रथमच धनगर समाजाला प्रतिनिधित्व; अर्जुन काळे यांचा दणदणीत विजय!
दहिवडी: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माण तालुक्यातील आंधळी गावचे सुपुत्र अर्जुन काळे यांनी दणदणीत विजय मिळवला असून, त्यांच्या या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण माण तालुक्यात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयामुळे सातारा जिल्हा बँकेच्या इतिहासात एका नवीन पर्वाचा प्रारंभ झाला आहे.
धनगर समाजाला मिळाला पहिला प्रतिनिधी
विशेष म्हणजे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत धनगर समाजाचा एकही प्रतिनिधी किंवा संचालक या बँकेवर निवडून गेला नव्हता. मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि दूरदृष्टिकोनामुळे हा दुवा जुळला असून, अर्जुन चांगदेव काळे यांच्या रूपाने धनगर समाजाचा पहिला संचालक सातारा जिल्हा बँकेवर विराजमान झाला आहे. या ऐतिहासिक निवडणूकीमुळे धनगर समाजात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
माण तालुक्यात उत्साहात जल्लोष
अर्जुन काळे यांचा विजय निश्चित होऊन ते माण तालुक्यात प्रथमच दाखल होताच, कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी त्यांचे अत्यंत दणक्यात स्वागत केले. विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली आणि एकमेकांवर गुलाबाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. या स्वागताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या विजयामुळे माण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून, अर्जुन काळे यांच्या रूपाने बँकेच्या संचालक मंडळाला एक सक्षम व तडफदार नेतृत्व मिळाले असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
