तीन दिवस पाठलाग, अखेर मोळाचा ओढा येथे सापळा! दोन बालकांकडून ७ दुचाकी जप्त
सातारा : शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढलेली असतानाच सातारा शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे.
सातारा शहरातील गोडोली परिसरातील पालवी चौकातून २९ ऑक्टोबर रोजी एक मोटारसायकल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या घटनेचा तपास करताना सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू केला. संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवत पोलिसांचे एक पथक तब्बल तीन दिवस त्यांच्या मागावर होते.
अखेर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी साताऱ्यातील मोळाचा ओढा परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघेही विधिसंघर्ष बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या पालकांसमक्ष चौकशी केली असता त्यांनी सातारा शहर परिसरातून चार, सातारा तालुका परिसरातून एक आणि कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधून एक अशा सहा मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
चोरी केलेल्या मोटारसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या मदतीने चोरीच्या मोटारसायकली लपवून ठेवलेली ठिकाणे शोधून काढली. यावेळी चोरीच्या सहा मोटारसायकलींसह गुन्हा करण्यासाठी वापरलेली आणखी एक मोटारसायकल, अशा एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, एका मोटारसायकलचा चॅसिस आणि इंजिन क्रमांक खोडण्यात आल्याचे आढळल्याने त्या वाहनाबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरात आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दुचाकी नेहमी सुरक्षित आणि अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावी. शक्यतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखालील ठिकाणीच वाहन पार्क करावे. केवळ हँडल लॉकवर अवलंबून न राहता डिस्क लॉक, व्हील लॉक किंवा मजबूत चेन लॉकचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
