सातारा

नेरले गौंड ते नवारस्ता: पाटण तालुक्यात जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासन अनभिज्ञ की मेहेरबान?

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

पाटण: तालुक्यात सध्या जुगार अड्ड्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले असून तालुका जुगार माफियांचा ‘हब’ बनल्याचे चित्र समोर येत आहे. नवारस्ता, निसरे विहीर, नेरले गौंड यांसह विविध भागांत दररोज लाखोंची उलाढाल असणारे बेकायदेशीर जुगार अड्डे खुलेआम सुरू आहेत. या जुगार माफियांच्या पाठीशी नेमकी कोणाची अदृश्य ताकद आहे? असा सवाल आता त्रस्त नागरिक विचारत आहेत.

​तरुणांना अन् शेतकऱ्यांना जाळ्यात ओढण्याचे कारस्थान

पाटण तालुक्यातील बहुतांश जनता ही शेतकरी आणि कष्टकरी वर्ग आहे. या साध्या-भोळ्या लोकांना, तसेच कॉलेजमधील अनभिज्ञ तरुणांना ‘कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे’ आमिष दाखवून जुगाराच्या दलदलीत ढकलले जात आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, या संपूर्ण रॅकेटवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

​गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांचे अड्डे

मिळालेल्या माहितीनुसार, नवारस्ता तसेच निसरे विहीर येथील ‘सेंच्युरी हॉटेल अँड बिअर बार’समोर सागर पवार, प्रदीप (अण्णा) सुर्वे, संतोष मोहिते, सुरज सुर्वे (काका), विशाल तात्याबा पवार (नाडे) व गणेश ढवळे (जीडी) यांच्या संयुक्त मालकीचा जुगार अड्डा सुरू आहे. विशेष म्हणजे, यातील प्रदीप (अण्णा) सुर्वे हा कराड येथील एका गंभीर खून प्रकरणातील आरोपी असल्याचे समजते.

​तसेच, नेरले गौंड या ठिकाणी मोरगिरी येथील संपत शेठ कोळेकर या बड्या कॉन्ट्रॅक्टरचा जुगार अड्डा मोठ्या प्रमाणावर चालवला जात आहे. अशा गुन्हेगारी आणि राजकीय/आर्थिक वजन असलेल्या व्यक्तींमुळे परिसरातील सामान्य नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

​पोलीस प्रशासन अनभिज्ञ की मेहेरबान?

सदर जुगार अड्ड्यांची माहिती जर गल्लीबोळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहे, तर स्थानिक पोलीस प्रशासनाला या बाबींची माहिती नसेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कायदेतज्ज्ञ आणि नागरिकांमधून व्यक्त होणाऱ्या संतापानुसार, येथील प्रशासन या जुगार माफियांच्या ताटाखालचे मांजर बनले आहे की काय, अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे.

​वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन पाटण तालुक्यातील हे जुगार अड्डे उद्ध्वस्त करावेत आणि संबधित माफियांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी तालुकाभरातून केली जात आहे.

error: Content is protected !!