लोहगावमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप तोडून तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरात बंद फ्लॅटला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी कपाटातील सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी लोहेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मूळचे खडकी, पुणे येथील रहिवासी असून, त्यांच्या नातेवाईकांचा लोहेगाव येथील संत नगर परिसरातील बेलिटा होम्स लेन क्रमांक ७ मधील फ्लॅट क्रमांक २०४ हा बंद होता. दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.३० ते दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी साधनाच्या मदतीने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
या घटनेची माहिती मिळताच लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बंद फ्लॅट फोडून झालेल्या या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कलमे : भारतीय न्याय संहिता ३०५(अ), ३३१(३), ३३१(४).
