वडगाव शेरीत चोरट्यांचा धुमाकूळ! बंद फ्लॅटचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास!
पुणे: पुण्यातील वडगाव शेरी परिसरात बंद फ्लॅटला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. सानेगुरुजी सोसायटी परिसरातील शैलेंद्र अपार्टमेंटमधील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी झाली. तक्रारदार हे कामानिमित्त बाहेर असताना त्यांचा फ्लॅट बंद होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमच्या कपाटातील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने चोरून चोरटे पसार झाले.
या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच गुन्हा क्रमांक ४९९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.
