सिंहगड कॉलेज परिसरात गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह तरुणाला अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
पुणे : सिंहगड लॉ कॉलेज परिसरात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. १ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत असताना पोलिसांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात एक तरुण गावठी कट्टा घेऊन थांबला आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक अमित सुवरे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे संशयित तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. कुणाल भागवत शेते (वय २३, रा. सध्या फ्लॅट क्रमांक ५०२, पंचम प्राईड, भुजबळ, मूळ रा. माही जळगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी दोन्ही वस्तू जप्त करून आरोपीला अटक केली.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४६/२०२६ अन्वये भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक रंगराव पवार, संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित सुवरे तसेच पोलीस अंमलदार अभिनव चौधरी, संग्राम पवार, सचिन सरपाळे, निलेश खैरमोडे, किरण साबळे आणि मंगेश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
